Tuesday, October 18, 2016

घोषणा !

नमस्कार मी *डॉ. निलेश निकम* *(MS Laparoscopic Surgeon नाशिक)* *MMC Elections-2016* साठी आपले प्रतिनिधित्व करू इच्छित आहे. माझ्या समस्त डॉक्टर बांधवांनो, सध्या आपल्यापुढे अनेक नवीन समस्या उभ्या ठाकल्या आहेत.क्लिनिक आणि हॉस्पीटल उभारणी करताना आवश्यक रजिस्ट्रेशनसंबंधी तयार करण्यात आलेल्या जाचक अटींमुळे प्रॅक्टिस करणे दिवसेंदिवस अवघड आणि खर्चिक होत चालले आहे. यातच क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्टच्या नावाखाली आपल्या समस्यांमध्ये अधिक भर टाकली गेली आहे. यामुळे सर्वसामान्य वैद्यकीय व्यावसायिकास प्रॅक्टिस करणे अधिकाधिक अवघड होत चालले आहे. पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याच्या अनेक त्रुटींमुळें तर 'चोर सोडून संन्याशाला फाशी'असे काहीसे होऊ लागले आहे आणि याचा फटका आपल्याच डॉक्टर बांधवाना बसत आहे. डॉक्टर व्यवसायाशी काहीही संबंध नसलेल्या व्यक्ती आणि कॉर्पोरेटस् पैशाच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात शिरकाव करीत आहेत आणि त्यायोगे नफेखोरी करून आपल्या नोबल प्रोफेशनला काळिमा फासत आहेत. डॉक्टर पेशंट संबंध दुरावले गेल्याने दिवसेंदिवस डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे ही एक अत्यंत चिंतेची बाब आहे. डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून केसेस चालवल्या जातात पण त्यातही कायद्यात सुसूत्रता नसल्याने वेळ आणि पैसा दोन्हीही गमावून देखील आपल्याला न्याय मिळत नाही अशी परिस्थिती आहे. मित्रानो मी नाशिकसारख्या छोट्या शहरातील एक वैद्यकीय व्यावसायिक असल्याने या सर्व समस्यांची मला चांगली जाणीव आहे आणि मी देखील त्यांना सामोरा जात आहे. माझ्या सर्व डॉक्टर बांधवांचा आवाज वरिष्ट पातळीवर पोचावा आणि आपल्या समस्यांना वाचा फोडावी या हेतूने मी यावर्षी MMC 2016 लढवण्याचे ठरवले आहे. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन. मी आपणास विनंती करतो की येत्या *MMC 2016 Elections* साठी आपण मला एक संधी अवश्य द्यावी.

No comments:

Post a Comment